जेजुरीः भाजपचे पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष वासुदेव काळे यांची महाराष्ट्र कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर पद हे राज्यमंत्री कॅबिनेट दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहर भाजपकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. वासुदेव काळे यांनी या अगोदर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
वासुदेव काळे हे मूळचे दौंड तालुक्यातील असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीयपैकी ते एक आहेत. किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यपदी त्यांची निवड राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यामुळे आता काळे यांची महाराष्ट्र कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.