महायुतीमधील मोठा भाऊ अर्थातच भारतीय जनता पार्टीची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा नव्याने निवडणुक लढवण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम, चंद्रकांत पाटील कोथरूड, सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर, पर्वती माधुरी मिसाळ तर दौंडमधून राहुल कुल यांना निवडणूक लढविण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. या यादीत दोन ब्राम्हण समाजाचे चेहरे असून मराठा, ओबीसी व इतर समाजातील उमेदवारांचा समावेश आहे.
सगळ्यात मोठी बातमी म्हणजेच चिंचवड विधानसभेसाठी चर्चेत असलेल्या दिवंगत आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांचा पत्ता कट केला असून, शंकर जगताप यांना भाजपने या मतदार संघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हान यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार?
भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उद्या पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षातील जेष्ठ नेत्यांबरोबर बैठक सुरू असून, त्यानंतर अंतरिम नावांवर शिक्का मोर्तेब होणार आहे.