घेवडा,चवळी,मूग,तूर,पावटा,भुईमूग,सोयाबीन कडधान्ये पिकांची पेरणी
भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यासह ,भाटघर धरण परिसरात आठ दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे चहुकडे शेतातील मशागतीची कामे पूर्ण होऊन खाचरे पेरणी योग्य तयार करणे सुरू होते त्यातच पावसाने पुर्ण उघडीप दिल्याने पेरणीसाठी योग्य झालेल्या शेतातुन वेळवंड खोऱ्यात खरीपाची पेरणी जोमाने सुरू आहे. या पेरणीमध्ये प्रामुख्याने घेवडा, चवळी, मूग, तूर, पावटा, भुईमूग, सोयाबीन,तीळ,धने अशी कडधान्ये पिकांची पेरणी केली जात आहे. बहुतांश ठिकाणी भात तरवे पेरणी झाली असून नदी काठच्या भात खाचरातून अजुनही भात तरवे टाकणी सुरू आहे.
यावर्षी सात जूनलाच पावसाचे आगमन झाले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले होते. भात तरवे पेरणीसाठी लगबगीला आलेला शेतकरी खाचरातून पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली होती.पावसाने उघडीप दिल्याने शेतजमिनीचा वाफसा गेल्यावर घातीवर आलेल्या शेतात बैलांच्या साह्याने औताने कडधान्ये पेरणी करण्यात शेतकरी मग्न झाला आहे.काही ठिकाणी बैल जोड्या कमी असल्याने ट्रॅक्टरला पसंती दिली जात आहे तर काही ठिकाणी मशागत केलेल्या शेतातून शेतकरी स्वतः हात कोळप्याच्या साह्याने पेरणी करत आहे. बैलजोडीचा दिवसभराचा रोज पंधराशे ते दोन हजार रूपये असुन ट्रॅक्टरसाठी रोटरला ताशी हजार, फणडणी , नांगरटला ताशी नऊशे रुपये मोजावे लागत आहेत.पडलेल्या पावसाने शेतजमिनींना योग्य ती ओल मिळाल्याने कडधान्ये पेरणीसाठी अनुकूल वातावरण आहे. पाऊस उघडल्या पासुन सकाळी उन्हाचा तडाखा दुपारी ढगाळ हवामान असे वातावरण सध्या आहे.
यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असून यावर्षी जेवढा उन्हाचा तडाखा बसला होता तेवढाच पाऊस देखील जोरदार मुसळधारपणे बरसणार असल्याची जून्या बुजुर्ग शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.