प्रशासकीय अधिकाऱ्यांचे रस्ता कामाकडे दुर्लक्ष?
भोर : पुणे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून यामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे.तर भोर तालुक्यात कापूरहोळ – भोर – वाई रस्त्याचे काम सुरू असून अनेक दिवसापासून तो रस्ता उकरून तसाच ठेवण्यात आला आहे दोन दिवस पाऊस पडल्याने बुवासाहेब वाडी (ता. भोर)(Bhor ) येथील रस्ता उकरलेल्या ठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे निसरड्या रस्त्यावरून वाहने घसरत असून रस्त्याला घसरगुंडीचे स्वरूप निर्माण झाले आहे.
मागील एक वर्षापासून कापूरव्होळ-भोर-वाई (Kapurhol -Bhor-wai) या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील बुवासाहेब वाडी येथील वळणा शेजारी मोरीचे बांधकाम सुरू असून त्याला पर्याय रस्ता पूर्व बाजूने तयार केला आहे. हा पर्याय रस्ता मुरूम मातीचा असल्याने पावसामुळे येथे मातीचा चिखल झाला आहे.
ही माती चिकट असल्याने वाहने रस्त्यावरून घसरत आहेत. या रस्त्यावरून वाहने मंद गतीने जात आहेत. तर दुचाकीस्वारांना दुचाकी चालवणे फारच मुश्किल झाले आहे. शाळकरी मुलेही या रस्त्यावरून पायी जात असून या मुलांना चिखलातून रस्ता शोधावा लागत आहे. शेजारून जाणारी वाहने घसरत असल्याने वाहन अंगावर येते की काय ? अशी मनात भीती निर्माण होत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून बुवासाहेब वाडी येथील मोरीच्या कामासाठी पर्यायी रस्ता तयार केला आहे. या मोरीचे काम काही दिवस बंद होते. यामुळे मोरीच्या कामाला विलंब लागला. हा पर्यायी रस्ता मुरूम व चिकट मातीचा असल्याने पावसामुळे या ठिकाणी निसडेपणा निर्माण होत आहे. सध्या पाऊस काळ असल्याने या रस्त्यावरून जाणे धोकादायक झाले आहे. परंतु दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव वाहन याच रस्त्यावरून जात आहेत.
काम करायचे नव्हते तर रस्ता का उकरला? नागरिकांचा सवाल
गेल्या तीन महिन्यांपासून मोरीच्या कामासाठी रस्ता उकरला होता. जर ठेकेदार कंपनीला या ठिकाणचे काम लवकर करायचे नव्हते तर रस्ता उकरलाच कशाला ? असा संतप्त सवाल हैराण झालेले वाहन चालक करीत आहेत.