भोर प्रतिनिधी- कुंदन झांजले
भोरला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रविवार (दि.१९ )मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तालुक्यातुन हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्तही ठेवला होता परंतु या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपयांची रोख रक्कम तर एक मोबाईलची जबरी चोरी केल्याचे घटना घडली. याची फिर्याद भोर पोलिसात बळवंत दादासाहेब नेवसे (वय -६८) रा. पिराचामळा (भोर )व दिपक लक्ष्मण शेटे (वय -४२) चौपाटी (भोर) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याने चौपाटी येथून गर्दीचा फायदा घेत दिपक शेटे यांच्या खिशातून ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरून लांबवत लंपास केली होती. तर जरांगे पाटील यांची सभा संपल्यानंतर अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावरून मोबाईलवर बोलत घरी जात असताना चोरट्याने ओप्पो (OPPO) A3S कंपनीचा लाल रंगाचा मोबाईल हिसकावून धूम ठोकली. याची तक्रार भोर पोलिसात दिली असता भोर पोलिसांनी दमदार कामगिरी करत तात्काळ सापळा रचून चोरटा ज्ञानोबा पिराजी सुमुखराव (वय ३८) रा.राजुनगर बाबुळगाव ता.लातूर यास अटक करून जेरबंद केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जाधव व पोलीस हवालदार धर्मवीर खांडे करीत आहेत.