भात खाचरे तुडुंब ,भात तरवे लांबणीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली भाटघर धरण परिसरात मुसळधार पाऊस
भोर – शनिवारचा दिवस (दि८) दुपारनंतर सायंकाळी पावसाने गाजवला असुन भोर तालुक्यासह भाटघर धरण परिसरात जोरदार, धुवांधार, जबरदस्त पावसाची बॅटिंग पहायला मिळाली आहे. मागील चार दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटासह मुसळधारपणे पडत आहे.
दोन दिवसांपूर्वी नुकत्याच पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू झाली होती. शेती पूर्व मशागत,भात खाचरे वजावणी, ट्रॅक्टरच्या साह्याने फणडणी, रोटरणी , नांगरट, बैलांच्या साह्याने औताने कडधान्ये पेरणी सुरू होती. परंतु या झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरणी आता रखडली असुन भात खाचरे तुडुंब पाण्याने भरली आहेत .
भात तरवे पेरणीसाठी वजावणी करून पेरणी योग्य करून ठेवले होते परंतु ही भात खाचरे पूर्णपणे पाण्याने भरल्याने भात तरवे लांबणीवर पडले असून शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे . ब-याच भागात मुसळधार पावसाने झाडे ,दरडी,भात खाचरे ताली पडणे, घरावरील छप्पर, भिंती कोसळणे असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानास सामोरे जावे लागणार आहे. जनावरांसाठी पुढे भविष्यात साठव ठेवलेला सुका चारा पूर्णपणे भिजला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण होणार आहे.
मुसळधार पावसात, विजांच्या कडकडाटात नागरिकांनी घराबाहेर पडु नये व नदी किनारी भाटघर धरण परिसरात फिरण्यासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.