भोरला – खैर लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनावर रामबाग मार्गावर रात्रीची गस्त घालत असताना वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवार दि.१२ रात्री अकराच्या दरम्यान कारवाई केल्याची घटना घडली. रात्रीची गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार खैराची तस्करी करणारे वाहन महाडकडे जाताना आढळले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी खातरजमा करून एक ते दीड टन खैर तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून पिकअप या वाहनावर कारवाई केली.
खाजगी क्षेत्रातील खैराच्या झाडांची तोड करताना वनविभागाची परवानगी घ्यावी लागते परंतु काही भागातुन विनापरवाना खैर लाकडाची तोड करून खाजगी वाहनातून वाहतूक सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रगस्त घालताना सापळा रचून भोर वरून महाडकडे पिकअप एम-एच-०६ – बी-डब्ल्यू-७८१३ जाताना भोर एसटी डेपो समोर पकडून वाहनाची तपासणी केली. यावेळी खैराच्या झाडांची तोड करून विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राउत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुग्रीव मुंडे, वनरक्षक समीर जाधव , विशाल आढागळे , खासिम हिमोने यांनी वाहन ताब्यात घेऊन कारवाई केली. खैराच्या झाडांची तोड कोणी गेली कधी केली व कुठे सुरू आहे याचा तपास वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी राऊत करीत आहेत. तसेच प्राथमिक माहितीत ही खैराची वृक्षतोड खाजगी मालकीच्या रानातून झाल्याचे सांगण्यात आले आहे