भोर : तालुक्यातील पूर्व भागातील भोंगवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महादेव शिनगारे यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी आपल्या उपसरपंच पदाचा राजिनामा दिला आहे. हा राजिनामा सरपंच अरुण पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मराठा समाजासाठी युवा उपसरपंच महादेव शिनगारे नेहमीच अग्रेसर असतात. मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शिनगारे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.
यावेळी त्यांनी मी ज्या सामजिक भावनेतून राजकारणात आलो ती म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करता यावी व त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळून देता यावा परंतु गेली अनेक वर्ष ज्या समाजाने मला मान सन्मान दिला, तो माझा मराठा बांधव समाज आरक्षणासाठी लढत आहे.
मी समाजातील जागरूक नागरिक म्हणून सर्व सामान्य समाजा प्रती आदर राखून. आरक्षणाच्या लढ्यात सामील होता यावे व मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे. या लढ्याला पाठींबा म्हणून मी आपल्या भोंगवली ग्रामपंचायत उपसरपंच पदाचा राजीनामा देत असल्याचा त्यांनी सांगितले.