श्वसनाचे आजार बळवण्याची भीती
भोर: भोर पासून काही अंतरावर असलेल्या वीस खो-यातील भाबवडी येथे भोर शहरातील एका बड्या प्रतिष्ठीत व्यावसायिकाचा मोठा स्क्रॅप मटेरियलवर प्रक्रिया करून पक्का माल बनविण्याचा व्यवसाय आहे.
गेली अनेक वर्षे या गावात व गावच्या परिसरात सदर व्यावसायिकदार हा व्यवसाय करत आहे.अनेकांना यातुन रोजगारही मिळाला आहे परंतु हा कच्चा स्क्रॅपचा, प्लास्टिकचा केमिकल युक्त माल नष्ट करताना मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
भाबवडी (ता.भोर ) येथे मागील आठ दिवसांपूर्वी मंगळवार (दि.२६) हा केमिकल युक्त प्लास्टिकचा कचरा पेटवल्याने या गावात व गावच्या आजुबाजुच्या परिसरात मोठी या प्लास्टिकच्या वासाची मोठी दुर्गंधी व काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले .या गावातील लोक यामुळे हैराण झाले आहेत.लहान मुले, आजारी व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक यांना मोठा त्रास होत आहे.वातावरण प्रदुषित झाले असून गावातील लोकांना श्वसनाचे आजार बळवण्याची भीती निर्माण झाली आहे.
मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून देखील संबंधित प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून सदर व्यावसायिक नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
लवकरात लवकर या प्लास्टिक युक्त कच-याची , विल्हेवाट संबंधित व्यावसायिकदाराने लावावी व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर आग विझवून काळ्याकुट्ट धुरापासून, दुषित वासापासुन गावकऱ्यांची मुक्तता करावी अशी मागणी भाबवडीतील गावकऱ्यांनी केली आहे.