नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावरील (pune-satara highway) राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मधुशाला बिअर अॅन्ड वाईन शॅाप नावाच्या मध्यविक्रीच्या दुकानाचे शटर लोखंडी रॅाडच्या साह्याने तोडून ४ लाखाची रोख रक्कम व १० हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बिअर शॅापीचे मालक उदय नंदकुमार आल्हाटे (वय ३२) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरच नेला चोरुन
चोरी करताना दिसू नये तसेच कुणाताही पुरावा त्यांच्याबाबत पोलिसांना मिळू नये, या उद्देशाने चोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरच चोरुन नेला. मात्र, दुकानातील मध्याच्या बाटल्या आहेत तशाच आहेत. सदर घटना शुक्रवारी रात्रीच्या वेळी घडली असून, याबाबत राजगड पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
मालकाला जीमला जाताना शॅापीचे शटर उचकटलेले दिसले आणि त्यानंतर…….
बारच्या मालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री बिअर शॅापीचे मालक आल्हाटे हे नेहमीप्रमाणे बिअर शॅापीला कुलूप लावून त्यांच्या घरी येवून झोपले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास जीमला जात असताना बिअर शॅापीचे शटर त्यांना एकाबाजूने उचकटलेले दिसले. यामुळे त्यांनी शॅापीच्या आत जावून पाहिले असता, शॅापीमधील माल आहे त्या ठिकाणी होता. परंतु, काऊंटरमध्ये ट्रेडसवाल्यांसाठी ठेवलेली रोख रक्कम ४ लाख त्यांना दिसले नाही. त्यामुळे त्यांनी शॅापमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणीसाठी कॅमेऱ्याचा डिव्हीआरकडे गेले असता, तो देखील त्या ठिकाणी नव्हता. यानंतर त्यांची खात्री पटली की आपल्या दुकानात रात्रीच्या वेळी चोरी झाली आहे. त्यानुसार त्यांनी ११२ वर डायल करुन पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.
मालकाने राजगड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे हे करीत आहेत.