राजगडः गेल्या अनेक वर्षांपासून राजगड तालुक्यातील बारा गाव मावळातील नागरिक सततच्या वीजपुरवठा खंडीत होणाऱ्या समस्येने हैराण झाले होते. कामथाडी येथील सबस्टेशनच्या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे नागिरकांना वीजपुरवठा खंडीत होण्याच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल भोर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी घेतली असून, तत्काळ सबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून कामथाडीचे सबस्टेशन बंद करून वेल्हे येथील सबस्टेशनला जोडणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कामाला सुरुवात झाली असल्याने या भागातील नागरिकांनी आमदार मांडेकर यांचे आभार मानले.
राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष किरण राऊत व पदाधिकाऱ्यांनी भोर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली त्यानुसार मांडेकर यांनी समस्येची गांभीर्याने दखल घेत तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कामथाडी सबस्टेशन बंद करून वेल्हे येथील सबस्टेशनशी जोडणी करावी, अशा सूचना दिल्या होत्या. १ डिसेंबर २०२४ पासून या कामाला सुरुवात झाली असून गेल्या चार दिवसांत वाजेघर बु, वाजेघर खुर्द, पिंपरी, पाल बु, पाल खुर्द, चऱ्हाटवाडी, पाथरदरा, सनणसवाडी, देवपाल, मेटपिलाववरे या गावांमध्ये काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित गावांमधील काम लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे गुंजनमावळ भागातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असून स्थानिकांनी आमदार मांडेकर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत. यामुळे आता बारा गाव मावळामध्ये नागरिकांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी दूर होऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.