शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख
शिक्रापूर ता. शिरुर येथील जय राम पोटे या युवकाने जागतिक स्तरावरील ‘आयर्न मॅन’ या स्पर्धेत सहभाग घेऊन पंधरा तासांची अथक व चित्तथरारक कामगिरी करुन यश मिळवीत भारताचा आयर्न मॅन होण्याचा बहुमान मिळवला आहे. यामुळे जय पोटेचे परीसरातून कौतुक होत आहे. येथील डॉ. राम पोटे यांचा पुत्र जय हा लहानपणापासून विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन आपली कामगिरी बजावत असताना तीन वर्षांपूर्वी त्याने आयर्न मॅन बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून पोहणे, धावणे व सायकल चालवणे या प्रकारांचा सराव सुरु केला.
दरम्यान, त्याने शैक्षण देखील सुरु ठेवत आपले आयर्न मॅन बनण्याची जिद्द, चिकाटी सुरु ठेवली. यामुळेच त्याने हे यश प्राप्त केले आहे. यापूर्वी इटली व इस्टोनिया येथे झालेल्या हाफ आयर्न मॅन स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवला होता. यावेळी त्याला वडील डॉ. राम पोटे व आई डॉ. संजीवनी पोटे यांची भक्कम साथ मिळाली. त्यांनतर नुकतेच इस्टोनिया देशात पार पडलेल्या आयर्न मॅन २०२४ स्पर्धेत सहभाग घेऊन पंधरा तासामध्ये न थांबता चक्क ४ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे आणि ४२ किलोमीटर धावणे हि स्पर्धा जिद्दीने व चिकाटीने अतिशय चित्तथरारक पद्धतीने पूर्ण करुन भारताचा आयर्न मॅन होण्याचा बहुमान मिळवला आहे.
यावेळी असलेला अनुभव खूप कठीण होता, क्षणोक्षणी काही वेदना जाणवत होत्या. मात्र आई वडिलांनी आपल्याला दिलेली साथ व त्यांनी यासाठी मला दाखवलेला विश्वास सध्या करायचा असल्याने मी जिद्दीने माजी कामगिरी बजावून यश मिळवले आणि माझे आयर्न मॅन होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
जय पोटे आर्यन मॅन विजेता
तर जय पोटे याने भारतातून आयर्न मॅन २०२४ होण्याचा बहुमान मिळवल्याने अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, सरपंच रमेश गडदे, बाळासाहेब नरके यांसह आदींच्या हस्ते जय पोटेचा सन्मान करण्यात आला.
आर्यन मॅन बनल्याचा अभिमान
जागतिक दर्जाची असलेली हि आयर्न मॅन स्पर्धा खूप कठीण होती, कारण सर्व खेळ आम्ही स्वतः उपस्थित राहून पाहिले आहेत. मात्र, भारतातून १८ ते २४ वयोगटाचे दोनच युवक यशस्वी झालेले असताना आमचा जय देखील यावर्षीचा भारताचा आयर्न मॅन २०२४ बनला असल्याचा अभिमान वाटत असल्याचे वडील डॉ. राम पोटे व आई डॉ. संजीवनी पोटे यांनी सांगितले.