मुंबईः महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे मात्र, त्यावर तोडगा अद्याप निघालेला नाही. कालच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी देखील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण परिस्थिती जैसे थे असल्याने आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे उबाठा गटाने प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उबाठा गट २८८ मतदार संघात उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथान बैठकांचे सत्र आघाडीत सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे. मुंबई, विदर्भातील अनेक जागांवर एकमत व्हायला तयार नाही. तसेच नाशिक, यवतमाळ, बुलढाणा आणि अमरावती येथील जागेबाबत काँग्रेस आणि उबाठात खटके उडत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे जर तोडगा निघाला नाही तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास उबाठा स्वबळाचा नारा देत २८८ ठिकाणी उमेदवार देणार असून, तशी चाचपणी पक्षातील नेत्यासोबत मातोश्रीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आता यावर काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.