जेजुरीः शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येथील मल्हार नाट्यगृह या ठिकाणी उद्या पार पडणार आहे. मात्र, सदर विकास कामे ही अर्थवट असून, त्यांच्या उद्घाटनाची घाई कशाला, असा सवाल शहर भाजपने केला आहे. तसेच काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. विविध आरोप भाजपकडून करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने मल्हार नाट्यगृहाला आमदारांचे नाव देणे, भाजीमंडईचे काम अर्धवट स्वरुपात झाले आहे. तसेच कामांचे कंप्लिशनाचे पत्र नसल्याचा आरोप करीत उद्घाटन करण्याची घाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या कार्यक्रमाला मा. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप हे उपस्थित असणार आहेत. मल्हार नाट्यगृहाचे उद्घाटन होण्यापूर्वीच ते वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहिला मिळत आहे. नाट्यगृहाला संकल्पना म्हणून आमदार संजय जगताप यांचे नाव देण्यात आले आहे. हे चुकीचे असून, शासकीय वास्तूला वैयक्तिक नाव देणे योग्य नसल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या निधीमधून सदर काम झाले असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.
पगडीवरून वांदग
मल्हार नाट्यगृहाची आसनक्षमता कमी असून, आसनावर खंडोबा देवाच्या पगडीचे चित्र आहे. यावर प्रेक्षक बसल्यावर त्यांची पाठ त्या पगडीवर येणार असून हा देवाचा अपमान असल्याचे सांगण्यात आले.
आलेला निधी जनसामान्यांसाठी योग्य पद्धतीने उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्वःताचे आणि कुटुंबाचे नाव टाकण्यात त्यांना आनंद मिळत असेल, तर हे त्यांना शोभणारे नाही. या गोष्टीचा निषेध भाजपकडून करण्यात येत आहे.
-मा. आमदार अशोक टेकवडे