भोर : “राजगड न्युज लाईव्ह” ने “अनाधिकृत गॅस वितरकाकडून नागरिकांचे जीवाशी खेळ” या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार पुरवठा विभागाने तालुक्यातील मौजे भोंगवली येथे छापा मारून २३ गॅस सिलेंडरचा अवैध साठा मिळून आला. याप्रकरणी उपगॅस वितरक हनुमंत किसन शिरगावकर यांच्यावर कारवाईची मागणी पुरवठा निरीक्षक भोर यांनी केली आहे.
पुरवठा निरीक्षक भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार ,श्री. शिरगावकर हे भारत गॅस कंपनीचे अधिकृत उपवितरक आहेत. त्यांनी ७ सिलेंडर राहत्या घरात ठेवून वितरण करण्यासाठी कंपनीशी करार केला होता. मात्र, पुरवठा निरीक्षक भोर यांनी तपासणी केली असता त्यांना शिरगावकर यांच्या राहत्या घराच्या अंगणात ५, ग्रामपंचायतीच्या जागेत ७ आणि शेजारील एका घरात ८ (एकूण २०) रिकामे सिलेंडर आढळून आले. याव्यतिरिक्त, शिरगावकर यांनी भाड्याने घेतलेल्या दुसऱ्या घरात ८ रिकामे आणि ३ भरलेले असे ११ गॅस सिलेंडर साठवून ठेवले होते.
अशा प्रकारे, शिरगावकर यांनी एकूण ३१ गॅस सिलेंडर अनाधिकृतपणे वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवले होते. हे सिलेंडर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करत, अत्यंत धोकादायक परिस्थितीत ठेवले गेले होते. सभोवताल घरे आणि माध्यमिक विद्यालय असल्याने यामुळे गंभीर अपघाताची शक्यता होती.
पुरवठा विभागाने या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी भारत पेट्रोलियम कॅर्पोरेशन लिमिटेड, जनरल थिमय्या रोड, सहजानंद कॉम्प्लेक्स, कॅम्प, पुणे- ०१ यांच्याकडे केली आहे.
शिरगावकर यांच्यावर गॅस नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर साठवणूक आणि धोकादायक परिस्थिती निर्माण करणे यासारख्या आरोपांमध्ये कारवाई होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे गॅस सिलेंडरच्या सुरक्षित साठवणुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुरवठा विभागाने आणि संबंधित कंपन्यांनी याबाबत अधिक कठोर नियम आणि तपासणीची व्यवस्था राबवणे गरजेचे आहे.
अवैधरीत्या व अनाधिकृतपणे वेगवेगळ्या ठिकाणी गॅस सिलेंडरचा साठा करणे अयोग्य आहे. तरी उपगॅस सिलेंडर वितरक हनुमंत किसन शिरगावकर यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करणेत यावी – पुरवठा अधिकारी भोर