जेजुरीः विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने प्रतिस्पर्धी असणाऱ्या महाविकास आघाडीची दाणादाण उडवत राज्यातील बहुतांशी मतदार संघात विजयाची पतका रोवली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला पदाचा राजीनामा राजभवनावर जात राज्यपाल यांच्याकडे सूपुर्त केला आहे. यामुळे आता राज्यात नवे सरकार येईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत. नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेला वेग प्राप्त झाला असून, तिन्ही पक्षातील आमदारांना मंत्रीपदाचे वेद लागलेले आहेत. पुंरदर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले विजय शिवतारे यांनी मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवतारे २०२४ मध्ये राज्यमंत्री होते. त्यांची आता कॅबीनेटपदी वर्णी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता पुंदरकरांचे लक्ष याकडे लागलेले आहे.
शिवतारे यांच्या कार्यकाळावर नजर
विजय शिवतारे यांचा राजकारणात उदय खऱ्या अर्थाने २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत झाला. शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांनी २००९ मध्ये निवडणूक लढवली आणि मा. आमदार संजय जगताप आणि दिगंबर दुर्गाडे यांना पराभवाची धूळ चारली. या काळात गुंजवणी प्रकल्प, पुरंदर प्रशासकीय इमारत, दिवे घाटातील धान्य गोडाऊन आदी प्रश्नांवर शिवतारे यांनी आपली रोखठोक भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचा २०१४ च्या निवडणुकीत देखील दणदणीत विजय झाला. २०१४ मध्ये शिवतारे यांना भाजप- सेना सरकारमध्ये जलसंपदा आणि जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री पद तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले होते.
२०१४ मध्ये हे प्रश्न अग्रस्थानी
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, जेजुरी एमआयडीसीचे विस्तारीकरण, दिवे येथील खेळाचे मैदान, आंतरराष्ट्रीय बाजार पुरंदर उपसा हे विषय होते. यापैकी गुंजवणीचे काम पूर्ण झाले मात्र पाईपलाईन, विमानतळ हे प्रकल्प वादविवादामुळे प्रलंबित राहिले. त्यातच मंत्रीपदाचा कार्यभार असल्याने पुरंदरकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. मराठा आरक्षणाबाबत सासवडमध्ये तब्बल १०० दिवस आंदोलन सुरु असताना याच तालुक्याचे मंत्री असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आणि विरोध वाढला. यामुळे २०१९ च्या निवडणुकीत शिवतारे यांचा संजय जगताप यांच्याकडून पराभव करण्यात आला.
२०२४ मध्ये शिवतारे यांचे कमबॅक
विजय शिवतारे यांनी २०२४ च्या निवडणुकीत अक्षरशःहा अनेक प्रश्न मांडत प्रचाराची राळ उठवली. पुन्हा तालुक्याचे प्रलंबित प्रश्नांवर भर देत त्यांनी विविध घोषणा केल्या. ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करीत राष्ट्रवादी अजित पवार गटात सामिल झाले. यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत झाली आणि विजय शिवतारे हे या मतदार संघातून निवडून आले. शिवतारे हे २०१४ मध्ये जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री होते. यामुळे त्यांनी या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी ते आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. यावर महायुती काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.