विश्वकोशाचे विद्याव्यासंगी संपादक सरोजकुमार मिठारीयांचे प्रतिपादन
वाई : सुशील कांबळे
वाई प्रतिनिधीं : सर्वसंगपरित्याग करून भारतीय स्वातंत्र्यचळवळीत समर्पण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान, जय किसान हा राष्ट्रोद्धाराचा महामंत्र देणारे लालबहादूर शास्त्री यांची जीवनगाथा म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अपूर्व पर्व आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशाचे विद्याव्यासंगी संपादक, लेखक सरोजकुमार मिठारी यांनी केले. वाईतील कलासागर अकॅडमी ज्युनिअर कॉलेजच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘गांधी समजून घेताना…’ या विषयावर ते बोलत होते. किसन वीर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे अध्यक्षस्थानी होते. लहुराज पांढरे, हेमंत काळोखे, अरुण आदलिंगे, रवींद्र घोडराज प्रमुख उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.
श्री. मिठारी म्हणाले, महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी देशभक्तीची भावना सामान्य लोकांमध्ये जागृत करून सामाजिक सुधारणांनाही बळकटी दिली. तर महात्मा गांधींनाच आदर्शवत मानून लालबहादूर शास्त्री यांनी देशाच्या कठीण काळात खंबीर नेतृत्व करून राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम हे ब्रीद सिद्ध करून दाखवले.
यावेळी अरुण आदलिंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. हेमंत काळोखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लहुराज पांढरे यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.