पारगांवः धनाजी ताकवणे
भारतीय जनता पक्षाने राज्यातील विधानसभेची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवार म्हणून पसंती देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार रमेश थोरात यांचे नाव जवळपास निश्चितच झाले असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या नावाची घोषाणा अद्याप जाहीर केले नसले, तरी माजी आमदार रमेश थोरात यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत जो पेढा एकमेकांना भरवून झाला होता, त्या पिढ्यांचाच या दोघात सामना रंगणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
परंतु लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी शरदचंद्र पवार गटाला साथ दिली. या गटातील पाच उमेदवार शरदचंद्र पवार गटाकडून ‘तुतारी’ या चिन्हावरती कोणीही पक्षश्रेष्ठी सांगतील तो उमेदवार या दौंड विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचेही ठामपणे सांगण्यात येत आहे. शरदचंद्र पवार गटातील आप्पासाहेब पवार, डॉ. भरत खळदकर, नामदेव ताकवणे, दिग्विजय जेधे, डॉ. वंदना मोहिते यांनी दौंड विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. यात दिग्विजय जेधे यांनी १३ दिवस दौंड जनसंवाद पदयात्रा काढून एक नवा युवा पर्याय म्हणून आपली जागा निश्चित करत असल्याचे सांगितले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची जागावाटपाची चर्चा जवळजवळ पूर्ण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली उमेदवारी यादी जाहीर करुन राजकरणात खळबळ उडवली होती. त्यानंतर आता भाजपनेही राज्यात आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात आमदार राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल कुल हे २०१४ ला महायुतीच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदा निवडून आले होते. सन २०१९ ला ही जागा भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने पक्षातील कुल यांना उमेदवारी अर्ज देऊन भाजपच्या चिन्हावर उभे केले. त्यावेळी रासपाने कुल यांनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप त्यावेळी त्यांच्यावर करण्यात आला होता.
गेली दहा वर्षांत तालुक्यातील केलेल्या विकास कामांची दखल पक्षाने घेऊन कुल यांना उमेदवारी मला देऊन जो विश्वास माझ्यावर टाकला आहे. त्यामुळे मी पक्षाचे व दौंडकर यांची धन्यवाद मानतो, असे कुल यांनी सांगितले. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बंडखोरी करत माजी आमदार रमेश थोरात यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप तरी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. थोरात यांचे नाव दौंड विधानसभेसाठी फिक्स करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात विधानसभा निवडणुकीत आमने-सामने येतील का ? आता लवकरच हे चित्र स्पष्ट होईल.