पुरंदर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार हेच महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दुसरीकडे या मतदार संघातून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने झेंडे स्वःताच प्रचार यंत्रणा राबविताना दिसत आहेत. तसेच मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०१९ मध्ये झेंडे हे निवडणूक लढविण्यावर ठाम होते. मात्र, शरद पवारांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी पुढच्या वेळी निवडणूक लढणार असल्याचे झेंडेनी संकेत दिले होते. सध्याच्या घडीला या मतदार संघात संजय जगताप हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. यामुळे झेंडे बंडाचे निशान फडकविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
संभाजीराव झेंडेबाबत काय निर्णय होणार?
कालच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक देखील होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामुळे कालपासूनच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाविकास आघाडी वा महायुतीकडून जागावाटप अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. आघाडी आणि युतीमध्ये जागावाटपात पेच निर्माण झाला असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. यातच अनेकजण पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी मिळणार या आशेने अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे. यामुळे या पक्षात इन्कमिंग वाढले असल्याचे पाहिला मिळत आहे. अशा राजकीय वातावरणात संभाजीराव झेंडेबाबत काय निर्णय होतो त्यावर झेंडे कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.
इच्छुक अनेक संधी कोणाला?
२००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक टेकवडे हे या मतदार संघातून आमदार झाले होते. त्यानंतरच्या काळात दोन टर्म या मतदारसघांचे प्रतिनिधीत्व शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी केले होते. त्यानंतरच्या काळात म्हणजेच २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने लढवून येथून संजय जगताप हे आमदार झाले. सध्याच्या घडीला पुरंदरमधून आघाडी आणि युती दोन्हींकडून इच्छूक उमेदवार अनेक आहेत. यामुळे कोणाला संधी मिळते हे पाहवे लागणार आहे.
अभी नही तो कभी नहीः संभाजी झेंडे यांचा नारा
लोकसभा निवडणुकीत आमदार संजय जगताप यांची खासदार सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यात मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे झेंडे यांनी पक्ष सावरण्याचे तसेच कार्यकर्त्यांचे मोठमोठे मेळावे घेऊन त्यांना उभारी देण्याचे काम केले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत पक्षनेत्वृत दखल घेऊन आपल्याला उमेदवारी देईल अशी आशा झेंडे यांना आहे. यामुळे त्यांनी अभी नही तो कभी नही असा नारा दिला आहे. यावर ते निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. यावर पक्षनेत्वृत्व काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
युती आणि आघाडीकडून इच्छुकांकडून तयारीला सुरूवात
महायुतीकडून मा. राज्यमंत्री विजय शिवतारे तयारीला लागले आहेत. भाजपकडून गंगाराम जगदाळे इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. ते देखील कार्यकर्ते मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन करीत आहेत. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले अशोक टेकवडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे यांचे समर्थक तालुक्यात बॅनरबाजी करून त्यांच्या उमेदवारीचे संकेत देत आहेत. यामुळे महायुतीमध्ये अनेकजण इच्छुक असल्याचे पाहिला मिळत आहेत. यावर पक्षश्रेष्ठ काय निर्णय घेणार यावर महायुतीकडून कोण निवडणूक लढणार हे ठरणार आहे.
यंदाची निवडणूक चुरशीची होणार…!
विद्यामान आमदार तालुक्यातील गावात भेटी देत असून विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना दिसत आहे. शिवतारे देखील गावभेट दौऱ्यात व्यस्त आहेत. विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. संभाजी झेंडे यांनी स्वःताह प्रचार यंत्रणा राबवली असून, गावोगावी जात अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावताना दिसत आहेत. तसेच तालुक्यात अनेक कार्यक्रम ते घेत आहेत. यामुळे पुरंदर विधान सभेची निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे जाणकार सांगतात.