शिक्रापूरः शेरखान शेख
सणसवाडी ग्रामपंचायतीच्या मा. उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होती. ही अपघाताची घटना ताजी असताना आता ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे अपघाती निधन झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायतचे मा. उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे हे पायी रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या वाहनाची त्यांना जोराची धडक बसली या घटनेत त्यांचे निधन झाले. ही घटना जूनमध्ये घडली होती. तर सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या निकिता हरगुडे यांची अपघाताची घटना ६ अॅाक्टोबरला घडली. दुर्देवाने त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला.
ही घटना पुणे-नगर महामार्गावरील कल्याणी फाटा येथे कंपनीमध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना घडली. अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने चाललेल्या दुचाकीची निकिता यांना जोराची धडक बसून, निकिता या रस्त्यावर पडल्या. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
ग्रामपंचायत सदस्य निकिता रामदास हरगुडे यांचे वय अवघे २६ वर्षे होते. माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे यांचा रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झालेला असताना चार महिन्यात पुन्हा ग्रामपंचायत सदस्य युवतीचा अपघात झाल्याने गावावर मोठी शोककळा पसरली आहे.