पारगांवः धनाजी ताकवणे
यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दुरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस सहाय्यक निरीक्षक किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारामार्फत अज्ञात इसम हा बनावट नोटा बाजारात वापरण्यासाठी पाटस गावच्या हद्दीत पुणे-सोलापुर हायवे रोडचे पाटस ब्रिजखाली मोटार सायकलवरून घेवून येणार आहे, अशी बातमी मिळाली.
या बातमीच्या आधारे किशोर वागज यांनी नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन यांना माहिती दिली. तसेच सापळा रचून अमितकुमार रामभाऊ यादव, वय ३१ वर्षे, मुळ रा. भमारपुरा ता. जालेय जि. दरभंगा राज्य बिहार हल्ली रा. शालीनी कॉलेज, कोंढवा पुणे राकेश चंद्रशेखर यादव रा. दरभंगा बिहार या दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सदर कामगिरी सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे, भानुदास बेडमेली पोलीस हवालदार हिरामण खोमणे, पोलीस कॅान्सबेल दत्तात्रय टकले, गणेश मुटेकर, दोन पंच व महाराष्ट्र बँकेचे प्रतिनिधी यांच्यासह सापळा रचून करण्यात आली. यावेळी आरोपींकडे तब्बल दीड लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
सध्या नवरात्रीचे दिवस आहेत. यानंतर दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. यामुळे अशा प्रकारे बाजारात बनावट चलनी नोटा आणून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता सूत्रांनी दिले आहे. यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.