हडपसरः ईद ए मिलाद मिरवणुकीच्या अनुषंगाने तुकाई टेकडीजवळ एक मुलगा तरुणीचा हात ओढताना त्या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अमंदारास दिसला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत हुज्जत घातल्याची घटना घडली आहे. यानंतर त्याला पोलीस चौकीत आणले असता चौकीत देखील गोंधळ घालत पोलीस अमंलदाराला या तरुणाच्या बहिणीने शिवीगाळ केली. त्यानुसार पोलीसांनी बहीण भावाला अटक केली आहे.
या संपूर्ण प्रकार फुरसुंगी चौकीत घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वरनिल दिनेश सुरवाडे (वय २०, रा. काळेवडळ) व पुजा दिनेश सुरवाडे (वय २५) अशी अटक केलेल्या बहिण-भावांची नावे आहेत. पोलीस अंमलदार सागर सुर्यवंशी यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सुर्यवंशी हे शनिवारी ईद ए मिलाद मिरवणुकीच्या बंदोबस्ताला जाण्यासाठी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ते जात होते. त्यावेळी त्यांना तुकाई टेकडीजवळ स्वरनिल हा एका मुलीचा हात पकडून तिला ओढत नेत असताना त्यांना दिसला. सुर्यवंशी यांनी या तरुणाकडे याबाबत विचारपूस केली. मात्र, या गोष्टीचा त्याला राग आल्याने त्याने सूर्यवंशी यांना शिवीगाळ करून व दमदाटी केली. त्यानंतर त्याला पोलीस चौकीत आणले असता त्याने त्या ठिकाणीही सागर यांचा पोलीस शिपाई शेलार यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असतानाही त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की केली. बहिण पुजा ही देखील पोलीस चौकीत आली. तिने पोलिसांना शिवीगाळ केली. यामुळे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे अटक केली असून, पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.