निरा/ तुळशीराम जगताप (रियालिटी चेक)
सरकारी दवाखान्यात गर्दी, खाजगी दवाखान्यात गर्दी, दवाखान्याच्या बाहेर गर्दी, प्रत्येक लॅब बाहेर गर्दी, हातात औषधांच्या प्लास्टिकच्या पिशव्या, रुग्णांचे लॅबचे रिपोर्ट आणि रुग्णांचे जेवण घेऊन इकडे तिकडे धावपळ करणारे नातेवाईक असे विदारक चित्र निरा पंचक्रोशीतील डेंगू आणि चिकनगुनिया आजाराचे थैमानाने दिसत आहे. निरा येथील अनेक दवाखान्यांमध्ये जागा शिल्लक नसल्याने अनेक रुग्ण बाहेरगावी किंवा घरीच उपचार घेत असताना दिसत आहे.
गवते वाढून डासांचे साम्राज्य
निरा पंचक्रोशीमध्ये (निरा- शिवतक्रार, पिंपरे खुर्द, गुळूंचे, कर्नल वाडी, पिसुर्टी, जेऊर आणि मांडकी) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्यापूर्वी आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायती) यांनी समन्वयाने मनापासून वारकरी आणि स्थानिक जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून आपली कर्तव्य तत्परता दाखवली होती. तरीही निरा पंचक्रोशीतील जनतेला पालखी सोहळ्यानंतर व्हायरल इन्फेक्शनने बेजार केले होते. पालखी सोहळ्यानंतर निरा पंचक्रोशीमध्ये पावसाळा सुरू झाला. सगळीकडे पावसाने हैदोस घातला असला तरी, येथे मात्र पाऊस जास्तही नाही आणि कमीही नाही अशी परिस्थितीमध्ये नदीला पूर असला तरी ओढे नाले अजून वाहलेच नाहीत. सतत पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साठून गवते वाढून डासांचे साम्राज्य निर्माण होऊन डेंगू, चिकुन गुनियाला वाव मिळत आहे.
यामुळे येतोय आरोग्य यंत्रणेवर ताण
शासकीय आरोग्य यंत्रणा त्यांचे योगदान पूर्ण क्षमतेने देत आहे. तळा गाळात जाऊन जनजागृती होत आहे. त्यांची क्षमता आहे तेवढ्या जनतेला आरोग्य यंत्रणा उपचाराची सुविधा पुरवत आहे. ग्रामपंचायतीही धुरळणी, फवारणी आणि गटारे सफाई करताना दिसून येत आहे. तरीही डेंगू आणि चिकनगुनिया यंत्रणेला आव्हान देऊन थैमान घालताना दिसून येत आहे. असे का? कारण या यंत्रणांचे कार्यक्षेत्र मोठे, मोठी लोकसंख्या, सुविधांचा अभाव औषधांचा परिपूर्ण पुरवठा नाही आणि परिपूर्ण निधीची तरतूद नसल्याने यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मर्यादा पडत आहेत.
नागरिकांनी देखील आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे
डेंगू आणि चिकूनगुनियाच्या थेमानाला या यंत्रणात जबाबदार आहेत असे नाही याला आपणही जबाबदार आहोत. सार्वजनिक कर्तव्याची जबाबदारी त्यांच्यावर आहेच आहे, पण आपल्या खाजगी मालमत्तेची साफ सफाई सुद्धा त्यांनीच करायची का? ही आपली जबाबदारी नाही का? अनेकांनी येथे मालमत्ता घेऊन ठेवल्या आहेत काहींच्या इमारती पडीक मोडकळीस अवस्थेत आहेत व ते दुसरीकडे ऐश्वर्याचे जीवन जगत आहेत. त्यांच्या जागेत साठलेली डबकी आणि वाढलेले गवत त्रास व भुर्दंड मात्र स्थानिक जनतेला. जनता मात्र गपगुमान दवाखान्याला पैसे मोजत आहे. अशा बेफिकीर व निष्काळजी लोकांच्यावर आरोग्य खात्यांनी आणि ग्रामपंचायत यांनी साथ रोग अधिनियमानुसार गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.
तालुक्यात मोठ्या शासकीय रुग्णालयाची कमतरता
निरा पंचक्रोशीतील ८० टक्के जनतेकडे पाच लाखापर्यंत आयुष्यमान भारत तसेच महात्मा फुले योजनेची मोफत उपचाराची कार्ड आहेत. परंतु, संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये कोठेही गंभीर आजारावर मोफत उपचाराची सुविधा नाही. तालुक्यात मोठे सरकारी रुग्णालय अथवा चॅरिटेबल हॉस्पिटल नाहीत. हे पुरंदर तालुक्याचे दुर्दैव आहे. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना ससून पुणे, सिल्वर जुबली-महिला रुग्णालय-वैद्यकीय महाविद्यालय आणि चॅरिटेबल हॉस्पिटल बारामती, फलटण, लोणंद आणि सातारा या दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या कोणाला बाहेर कुठेही आधार नाही, त्यांना कर्ज काढून का होईना स्थानिक ठिकाणी खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन जगण्याची लढाई लढावी लागत आहे. त्यामुळे निरl पंचक्रोशीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायती यांनी डेंगू व चिकूनगुनियामुळे उद्भभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या असलेल्या सेवेवर मर्यादा पडत असल्याने तातडीने एकत्रित विचारविनिमय करून समन्वय साधून महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेकडे तात्पुरत्या का होईना अतिरिक्त ज्यादा सेवा यंत्रणा आणि औषधांची तसेच आपत्कालीन निधीची मागणी करणे आवश्यक आहे.