भोर: शहरात नंबरप्लेट नसलेले आणि कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या अॅटो रिक्षा राजरोसपणे फिरत आहेत. अशा रिक्षांमुळे अपघात झाल्यास अपघातग्रस्ताला कोणतीही नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे अशा विनानंबर प्लेटच्या आणि कागदपत्रे नसलेल्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी भोरवासीयांनी केली आहे.
शहर आणि तालुक्यात बेरोजगारी असल्याने अनेकांनी अॅटोरिक्षा घेवून व्यवसाय सुरु केला आहे. काही जणांनी शासनाच्या नियमानुसार रिक्षा खरेदी करून, योग्य ती कागदपत्रांसह विमाही भरलेला आहे. मात्र, काही जणांनी जुन्याच खराब झालेल्या किंवा पुण्या-मुंबईसारख्या शहरातून बंद पडलेल्या रिक्षांची डागडुगजी करुन खरेदी केल्या आहेत. अशा रिक्षांची कोणतीही कागदपत्रे नाहीत आणि रिक्षांवर नंबरप्लेटही नाही. त्यामुळे सदर रिक्षा या चोरीच्या आहेत की, नक्की खरेदी केल्या आहेत. याची चौकशी होणे गरजेचे आहे.
तसेच या रिक्षांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहेत. असे रिक्षाचालक नेहमी मद्यपान करून रिक्षा चालवितात. शहरातून जाताना रिक्षा मध्येच बंद पडणे, रिक्षामध्ये पेट्रोलएेवजी रॉकेल भरल्यामुळे धूर सोडणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांशी संबंधित रिक्षाचालकांचे वादांचे प्रसंग घडत आहेत.
शहरात जवळपास ५० रिक्षा आहेत. त्यापैकी काहीजण योग्य पध्दतीने भाडे घेतात. परंतू, काही रिक्षाचालक शेअरिंग रिक्षा केल्यानंतरही प्रत्येक प्रवाशाकडून वेगवेगळे भाडे आकरत असल्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्या वेळी तर प्रवाशांकडून दुप्पट भाडे जात असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे.
एका किलोमीटरसाठी मोजावे लागताहेत ५० रुपये
शहरातील एका किलोमीटर अंतरासाठी ५० रुपये भाडे आकारले जात आहे. याशिवाय रिक्षाचालक आपली रिक्षा रस्त्यात कोठेही उभी करून वाहतूकीला अडथळा निर्माण करीत असतात. शहरातील मुख्य रस्त्यावर अनाधिकृत रिक्षा स्टँड सुरु केले असून, तेथे इतर खासगी वाहने लावल्यास रिक्षाचालक मनाई करून वाद घालत आहेत. यामुळे संबंधित रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
शहरातील रिक्षाच्यां कागदपत्रांची खातरजमा करून नंबरप्लेट व कागदपत्रे नसलेल्या रिक्षाचालकांवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
अण्णासाहेब पवार पोलीस निरीक्षक