जेजुरीः श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी विश्वस्त मंडळाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग तथा अनाथ आत्महत्याग्रस्त मुलांच्या शैक्षणिक संस्था यांसाठी २१ लाख रुपये, तसेच शैक्षणिक कारणांसाठी ४ लाख असे एकूण मिळून २५ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. शैक्षणिक साहित्यासाठी तरतूद करून खऱ्या अर्थाने देवाचा पैसा वंचितांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गोकुळाष्टमीच्या औचित्य साधून मंदिर गडकोटावर ज्येष्ठ अभिनेत्री प्राजक्ता केळकर व अभिनेते अनिकेत केळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी सिने नाट्य बालकलाकार श्रीश व दर्श राजेंद्र खेडेकर, मनीषा खेडेकर अखिल मंडई गणपतीचे कार्याध्यक्ष भोला वांजळे, मनीषा वांजळे, श्री मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त मंगेश घोणे आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात जीवन विद्यामंदिर, सुपे तसेच अस्तित्व प्रतिष्ठान, वीर या दोन दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची दप्तरे व वही यांचे वाटप करण्यात आले. गरजूंना शैक्षणिक व आरोग्य मदत अशा पद्धतीचे प्रामाणिक सेवा देणारे देवस्थाने अतिशय दुर्लभ असून मार्तंड दिवसांच्या वतीने खऱ्या अर्थाने ईश्वर प्राप्तीचे मार्ग खुले करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे मत अभिनेते अनिकेत केळकर यांनी व्यक्त केले.
देव संस्थांच्या वतीने व्हीआयपी लाईन मधून आलेले पैसे या अशा कारणांसह साठी तसेच डायलिसिस सेंटर यासाठी वापरले जातात. दुष्काळग्रस्त भागात पाणी पाठवण्यासाठी तसेच दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळा अशा सामाजिक उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे वापरले जातात, अशी माहिती देव संस्थांचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी दिली.
यावर्षीचा जवळपास 90 टक्के निधी हा अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, दिव्यांग मुले यांना देव संस्थांच्या वतीने देण्यात आला. तसेच पुढच्या वर्षी यामध्ये भरीव अशी वाढ होईल अशी माहिती विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली. यावेळी मंदिराचे सर्व सेवेकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष खोमणे, महेश नाणेकर, कल्याण चव्हाण, सतीश दोडके, अतुल सकट, बाबा रोटे, विठ्ठल लांगी, सौरभ सकट, हनुमंत शेंडकर , हनुमंत खोमणे, रामकृष्ण भोसले, प्रतीक वाखरे, रवी लाखे, सचिन लोणकर, राजेंद्र नाकाडे, हेमंत खोमणे, प्रविण शेंडगे, सचिन जवळेकर, आनंद लोंढे प्रयत्न केले. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त अन्नदान आयोजित करण्यात आले होते. देव संस्थांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट सहभागी असेल अशी ग्वाही यावेळी मनीषा खेडेकर यांनी दिली.