खंडाळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून, अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाबाबत खंडाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवदेन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे खंडाळा तहसीलदारांना देण्यात आले. या निवेदनात दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर पावसाची संततधार सुरू असून बरीचशी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, जेणेकरून ओल्या दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची संधी शेतकरी वर्गाला मिळेल. अशी मागणी करीत, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी विनंती या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे वाई विधानसभा अध्यक्ष नितीन सावंत व कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी खंडाळा तालुक्याचे तहसीलदार अजित पाटील यांच्याद्वारे पिकांच्या नुकसानीबाबत तसेच शेतकऱ्यांच्या समस्या निराकारणाबाबत प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत योग्य ती दखल घेऊ असे सांगण्यात आले.