वाल्हे: सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावची सुकन्या सुधा सत्यवान भोसले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत २५७ गुण मिळवत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. पिंगोरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांचे तिचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर वाघेश्वरी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेऊन सुधा भोसले हिने पुण्यातील एस. एम. जोशी महाविद्यालयातून पदवी देखील प्राप्त केली. सुरुवातीला २०२१ मध्ये लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सुधा भोसले हिला अपयश आले होते .परंतु तिचे वडील सत्यवान भोसले हे आर्मीचे सेवानिवृत्त जवान असल्याने त्यांनी तिला अपयशाने खचून न जाता पुन्हा परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सुधा भोसले हिने २०२२ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी मात्र तिला यश मिळाले. अखेर तिने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान
पिंगोरीचे सरपंच संदीप यादव, उपसरपंच प्रकाश शिंदे, पिंगोरी विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन अजय भोसले, सिने अभिनेते विनोद शिंदे आरपीआयचे वाल्हे शाखाध्यक्ष शैलेंद्र भोसले आदी मान्यवरांसह ग्रामस्थांच्या वतीने सुधा भोसले हिचा विशेष सन्मान करण्यात आला.