सारोळा, ५ मे २०२४:आज दुपारी दोनच्या सुमारास सारोळा येथील पांडे गावजवळील इंडो आफ्रिका पेपर मिलमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीत कंपनीच्या कच्च्या मालाच्या गोदामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या बॉयलरपासून थोड्या अंतरावर असलेल्या गोदामात अचानक आग लागली. या आगीमुळे पेपर बनवण्यासाठी लागणारा मोठा प्रमाणात पुठ्ठा जळून खाक झाला. आग लागल्याची बातमी मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
कंपनीच्या अधिकारी आणि पोलिसांनी मिळून खंडाळा तालुक्यातील गोदरेज कंपनी आणि एसेन्ट कंपनीची अग्निशामक गाडी आणि भोर नगरपरिषदेची अग्निशामक गाडी तातडीने बोलावून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. या तीन अग्निशामक गाड्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणत्याही कामगार किंवा अधिकाऱ्यांना दुखापत झाली नाही.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट होत नाही. मात्र, कंपनीजवळ असलेल्या बॉयलरमधून उडणाऱ्या ठिणग्यांपासून आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेबाबत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि आगीमागे काय कारण आहे याचा तपास सुरू आहे.