ऐन उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर पडावे लागणार
पुणे : मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरु होताना सर्वच राजकीय पक्षांपुढे कडक उन्हाचे संकट उभे ठाकले आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर पडावे लागणार असल्याने सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात प्रचार करण्याशिवाय सर्वच राजकीय पक्षांना पर्यायच नसल्याचे चित्र आहे. तर कार्यकर्त्यांच्या सभा उन्हात घेतल्या जात असून काही प्रमुख पदाधिकारी आपल्या बैठका मात्र एसी हॉल मध्ये घेत आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण मतदार आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टंचाईची स्थिती आहे. टंचाईला सामोरे जाताना ग्रामीण मतदारांची दमछाक होत आहे. या स्थितीत मतदारांपर्यंत प्रचारासाठी जाताना सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे.
दुपारच्या सत्रात सभांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, ही बाब विचारात घेऊनच प्रचाराचे नियोजन होणार हेही स्पष्ट आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा सोशल मीडिया खूपच जास्त प्रभावी असल्यामुळे सोशल मिडियातून उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. आपल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ कार्यकर्ते दर तासाने काहीतरी पोस्ट व्हायरल करत असल्याचे दिसत आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या सभा, त्यातील महत्त्वाची वाक्ये, प्रसंग यांचे व्हिडिओ काही तासात लोकसभा मतदारसंघातील विविध ग्रुपवर तातडीने येतात. सोशल मिडियाचा वापर उमेदवारी जाहीर होण्याअगोदरपासूनच केला जात आहे.
बारामतीतील लढत विचारात घेता यंदा बारामतीत कोणत्या स्टार प्रचारकांच्या सभा होणार या कडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उन्हाची तीव्रता विचारात घेता सभा कमी करून घरोघरी प्रचारासाठी जाण्यावरच राजकीय पक्षांचा अधिक भर असेल. या शिवाय पदयात्रा, कॉर्नर सभांवरही यंदा जोर दिला जाईल अशी चिन्हे आहेत. परंतु आज पर्यंत झालेल्या सभा या भर उन्हात किव्हा मंदिरात घेतल्या जात आहे आणि याच्या उलट भागातील निवडक पदाधिकारी मात्र एसी हॉल मध्ये आपल्या मीटिंग घेत असून मतदारांची कितपत काळजी आहे याचे चित्र तर समोर आहेच..
बारामती लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात २३ लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याने सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये राहिलेल्या दिवसांमध्ये प्रचाराचे नियोजन करण्यात सध्या प्रमुख पदाधिकारी व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.