सुमारे 500 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
भोर : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी(दि. १ मे) शिवाजी विद्यालय चेलाडी, नसरापूर (ता. भोर) येथे सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणाऱ्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती वेळू(ता. भोर) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे प्रचारप्रमुख कुलदीप कोंडे यांनी दिली.
यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, भोर तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती मी शिवसेनेत प्रवेश केला असून विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढली जाणार आहे तसेच महायुतीच्या उमेदवार सुमित्रा पवार यांच्या विजयाची गाठ बांधण्यासाठी भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडणार असून या सभेसाठी तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तसेच या सभेच्या निमित्ताने भोर-राजगड-मुळशी येथील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत . तसेच भोर-राजगड तालुक्यातील थांबलेल्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व जण एकत्र आलो असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले.
या पत्रकार परिषदेच्या वेळी कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, रणजीत शिवतरे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, जिवन कोंडे, अमोल पांगारे, बाळासाहेब गरुड, संतोष घोरपडे, विकास चव्हाण, स्वप्नील गाडे तसेच बहुसंख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भोर औद्योगिकीकरणाचा प्रश्न पुन्हा समोर?
भोर तालुक्यातील युवकांच्या रोजगारावरती भोर तालुक्यातील औद्योगिकीकरणाचा प्रश्न समोर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोर येथे एमआयडीसी करणारी याचे देखील आश्वासन दिलेला आहे परंतु उद्या होणाऱ्या सभेच्या ठिकाणी पुन्हा एकदा भोरच्या एमआयडीसीचा मुद्दा समोर येणार असून या सभेनिमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे.