शिरवळ : ता. खंडाळा येथील बाजारपेठेमध्ये एका धक्कादायक घटना घडली. कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या पतसंस्था कर्मचाऱ्यांसमोर कर्जदार उदय विनायक गोलांडे यांनी वसुली कारवाईला विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ तालुका खंडाळा येथील उदय विनायक गोलांडे यांनी सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था शिरवळ येथून वीस लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यास टाळाटाळ केल्याने, पतसंस्थेने वसुली कारवाईला सुरुवात केली. जिल्हाधिकारी सातारा यांच्या निर्देशानुसार, नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, पतसंस्थेचे अधिकारी आणि चार पोलीस कर्मचारी गोलांडे यांच्या हॉटेल गुरुकृपा आणि राहत्या घरावर ताबा घेण्यासाठी गेले होते.
या प्रक्रियेदरम्यान, गोलांडे यांनी “तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला दाखवतो” असे म्हणून चाकूने स्वतःच्या पोटात दोन-तीन वेळा वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.त्यांना तातडीने डॉ. जोगळेकर हॉस्पिटल, शिरवळ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पतसंस्थेचे वसुली अधिकारी सम्राट मनोज भोसले यांनी गोलांडे यांच्याविरोधात शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. तर पुढील तपास शिरवळ पोलिस करीत आहेत.