खेड तालुक्यातील नागरिकांचे तहसील कार्यालयाकडे महसुली प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे एकाच दिवशी निकाली काढण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गुरुवारी (ता. २१) महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही अदालत पंचायत समिती खेड (सभागृह) येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी दिली.
या महसूल अदालतीमध्ये एकूण प्रलंबित असलेले १५८ प्रकरणातील पक्षकारांना यापूर्वीच नोटीसा बजावून आवश्यक दस्तऐवज/पुरावे, लेखी जबाबासह सुनावणीस हजर राहण्यासाठी कळविण्यात आले आहे. प्रकरणातील सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेऊन दाखल पुराव्यांच्या आधारे त्याच दिवशी संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेले प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार आहेत. यावेळी तलाठी मंडळ अधिकारी देखील हजर राहणार आहेत.