पुणे : पुणे जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा ऐतिहासिक निकाल लागला असून, तब्बल १५ वर्षांपासून असलेली प्रस्थापित सत्ता उलथवून ‘परिवर्तन पॅनेल’ने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने २१ पैकी तब्बल २० जागांवर विजय मिळवत पतसंस्थेच्या कारभारात मोठे सत्तांतर घडवून आणले.
या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातून परिवर्तन पॅनेलचे उमेदवार दिलीप प्रभाकर लोखंडे यांची संचालकपदी बहुमताने निवड झाली. ‘कपबशी’ या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या परिवर्तन पॅनेलला सभासदांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. बुधवार, दि. ३० रोजी पार पडलेल्या या निवडणुकीकडे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते.
दिलीप लोखंडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत संस्थेच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते मूळचे भोर तालुक्यातील माळवाडी संगमनेर येथील रहिवासी असून सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. प्रशासकीय कामकाजातील अनुभव, सेवकांच्या प्रश्नांबाबतची जाण आणि कामातील तत्परता यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
आरोग्य विभागात कार्यरत असतानाही इतर विभागांतील कर्मचाऱ्यांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. याच व्यापक संपर्काचा आणि सेवाभावी कार्यपद्धतीचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, दीड दशकानंतर झालेल्या या सत्तांतरामुळे पतसंस्थेच्या कामकाजात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विजयानंतर बोलताना दिलीप लोखंडे यांनी सभासदांचे आभार मानत संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सेवकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
लोखंडे यांच्या विजयामुळे भोर तालुक्यातील माळवाडी परिसरासह जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










