भोर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोर शहर कार्यकारिणीमध्ये झालेल्या अचानक बदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. संघर्षाच्या काळात पक्षासाठी जोखीम पत्करून उभे राहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते या बदल्यात उपेक्षित ठरल्याची चर्चा शहरभर रंगली असून, त्यामुळे पक्षातील ऐक्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
भोर शहरात अजित पवार गटात स्थानिक नेतृत्वाचा अभाव असताना, जुन्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेला आकार देत पक्षाची वाटचाल टिकवून ठेवली होती. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांची लढत असो किंवा विधानसभा निवडणुकीत शंकर मांडेकर यांच्या विजयाची वेळ, कार्यकर्त्यांनी धोके पत्करून निष्ठा अबाधित ठेवली होती. त्यामुळे आज अचानक झालेल्या कार्यकारिणी बदलामुळे कार्यकर्त्यांची पायमल्ली झाल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे.
तालुक्यातील काही नेत्यांच्या दबावाखाली ही फेरबदल झाली असल्याची चर्चा असून, “लढताना आम्ही उपयोगाचे, सत्ता आल्यावर आम्ही कचऱ्यात?” असा सवाल अनेक जुन्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर भोर शहरात प्रचंड असंतोष पसरला असून, याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, असा जाणकारांचा इशारा आहे.
दरम्यान, नागरिकांमध्येही या बदलाबाबत रोष दिसून येतो. “संकटाच्या काळात कार्यकर्त्यांनी ढाल बनून लढाई केली, पण आज सत्तेच्या खुर्च्या वाटताना त्यांना का दूर सारले जाते?” असा सूर स्थानिकांच्या चर्चेत ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनेत फुटीची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप शेटे यांनी मात्र नाराजीचे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले, “भोर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही नाराजी नाही. आम्ही सर्व एकविचारी आहोत. शहरातील पक्ष संघटना दिवसेंदिवस बळकट होत असून ही अफवा पसरविण्याचे काम विरोधक करत आहेत. आमच्यात फुट नाही, उलट पक्षवाढीचा प्रवास सुरू आहे.”