भोर: शिंदेवाडी येथील तरुण महेश शिवाजी गोगावले याने 14 नोव्हेंबरपासून वाघजाई माता मंदिर शिंदेवाडी येथून पुणे ,त्रिंबकेश्वर, द्वारका, सौराष्ट्र सोमनाथ, गिरनार जुना गड सौराष्ट्र गुजरात अशी तब्बल 2100 किलोमीटरची सायकल यात्रा दोन डिसेंबरला पूर्ण केली. आतापर्यंत गोगावले यांनी बारा ज्योतिर्लिंगपैकी उज्जैन, ओंकारेश्वर ,त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, सोमनाथ, नागेश्वर, भीमाशंकर, काशी वाराणसी, रामेश्वरम हे ज्योतिर्लिंग सायकलने पूर्ण केले.
या अगोदर निसर्ग भ्रमंती सायकल चालवा प्रदूषण टाळा, व्यसन मुक्ती, पाणी वाचवा, स्वच्छतेचा संदेश व जनजागृतीसाठी शिंदेवाडी पुणे ते नवी दिल्ली असा सोळाशे किलोमीटर सायकल प्रवास 2015 मध्ये पूर्ण केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने प्रोत्साहित होऊन स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ,बेटी बचाव बेटी पढाओ ,असा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास सायकल प्रवास केला.
प्रदूषण टाळा, सायकल प्रवासाच्या माध्यमातून संदेश देत जम्मू-काश्मीर ,पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात ,महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक, तामिळनाडू असा नऊ राज्यांमधून साडेचार हजार किलोमीटरची यात्रा 35 दिवसात पूर्ण केली. महेश गोगावले यांचा सायकल प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांचे कुटुंब, मित्र परिवार तसेच भोर तालुका, शिवगंगा खोऱ्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक मदत करत असतात. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक साडेआठशे किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण केला.
कोरोना काळातही केली होती सायकलद्वारे जनजागृती
2020 – 21 मध्ये कोरोनाच्या काळात जे संकट पूर्ण भारतामध्ये आलेलं ते कमी होण्यासाठी मास्क वापरा कोरोना मध्ये काय दक्षता घेतली पाहिजे यासाठी वाघजाई माता मंदिर शिंदेवाडी ते वैष्णोदेवी मंदिर कटरा जम्मू काश्मीर येथे अडीच हजार किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला होता. 2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या आजादी अमृत महोत्सवानिमित्त पुणे ते केदारनाथ अडीच हजार किलोमीटर सायकल पूर्ण केला.
2022 मध्ये पंढरपूर महाराष्ट्र ते गुमान पंजाब अडीच हजार किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण केला. गुमान येथे संत नामदेव महाराज यांची समाधी आहे. भागवत धर्माचा प्रसार करत ते महाराष्ट्रमधून गुमान पंजाबला त्यांनी साडेसातशे वर्षांपूर्वी पायी प्रवास पूर्ण केला.
2023 मध्ये पुणे पंढरपूर, सोलापूर ,अक्कलकोट, तुळजापूर, सांगली, कोल्हापूर अशा सायकल प्रवास पूर्ण केला. 2015 पासून सुरू झालेला सायकल प्रवास 16 राज्यांमध्ये आत्तापर्यंत वीस हजार किलोमीटर अंतर पूर्ण केले. या कामगिरीची दखल वज्र वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली आहे आणि लवकरच लिमका बुक ऑफ वर्ल्ड नोंद घेणार असल्याची माहिती आहे.