जेजुरीः पुरंदर तालुक्यातील पारगावच्या हद्दीत चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने मारहण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांत चार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ११ डिसेंबर रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. तेजस ज्ञानेश्वर कुंजीर (वय 24 वर्षे रा. वाघापुर, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चार इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ डिसेंबरच्या दिवशी साडेसात वाजण्याच्या सुमारास पारगावच्या हद्दीत अनोळखी चार इसमांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन क्र एम.एच 12 यु.सी .4767 हे घेवून आम्हाला रस्त्यामधे आडवी मारुन आमचा रस्ता आडवून आम्हाला आमचे दोन किलो सोने द्या, नाहीतर तुम्हाला व तुमच्या आईवडिलांना मारुन टाकीन, अशी धमकी त्यांनी दिली असल्याचे तक्रारीत फिर्यादी यांनी म्हटले आहे.
वाहनात जबरदरस्तीने बसवून मारहाण
तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला जबरदस्तीने त्यांनी त्यांच्या चारचाकी वाहनात घेवून आमचा खून करण्याच्या उद्देशाने ते आम्हाला घेवून पारगाव मार्गे वनपुरी येथे जबरदस्तीने नेले. त्यादरम्यानच्या काळात या इसमांनी फिर्यादी व त्यांची बहीण यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली असल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी चार अज्ञात इसमांविरुद्ध( नाव व पत्ता माहित नाही) गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे हे करीत आहेत.