जेजुरीः पुरंदर उपसा सिंचन योजनेचे एकूण ४ पंप हाऊस असून प्रत्येक पंप हाऊसला सध्या एकच पंप सुरु आहे. तोदेखील सुरळीत चालत नाही. त्यामुळे वितरिकेवरील शेवटच्या गावांना पाणी पोचवणे कठीण होत आहे. यामुळे येत्या आठ दिवसात सर्व पंप हाउसवरील दुसरा पंप चालू करण्याचे निर्देश पुरंदर तालुक्याचे आमदार विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागातील झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय एक ते दीड महिन्यात तिसरा पंपदेखील सुरू करण्याची तयारी करावी अशा प्रकारच्या सूचना देखील शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
पुण्यातील सिंचन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधिक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता अशोक शेटे, यांत्रिकी विभागाचे अधिक्षक अभियंता प्रकाश भोसले, कार्यकारी अभियंता नितीन जैस्वाल, उपअभियंता दत्तात्रय कसबे यांच्यासह पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी व प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच जानाई योजनेच्या दुरुस्तीसाठी मंजूर ५५ कोटींची दुरुस्तीची व अन्य कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थित असणाऱ्या शेतकरी वर्गाने केली. यावेळी राजाराम झेंडे, गणेश मुळीक, रमेश इंगळे, समीर जाधव, मयूर मुळीक, संतोष यादव, शरद यादव, सागर यादव, नितीन कुंजीर, दिपक यादव, निखील यादव, किशोर खळदकर, राजेंद्र गद्रे, मनोज कुंजीर, सागर करवंदे आदी उपस्थित होते.
जलवाहिनी करण्यासाठी प्रस्ताव
जनाई योजनेवरील नायगाव, पांडेश्वर, राजुरी आणि रीसे-पिसे या गावांना जनाई योजनेतून पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांना पुरंदर उपसा योजनेचे पाणी मिळावे आणि सीएसआर किंवा शासकीय निधीतून येथे जलवाहिनी करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना विजय शिवतारे यांनी दिल्या.