पुणे: शहरात सराफ दुकानावर चोरीच्या घटना सातत्याने वाढताना दिवस आहे. अशीच एक चोरीची घटना पुण्यातील बी टी कवडे रस्त्यावरील अरीहंत ज्वेलर्स नावाच्या सराफ दुकानात घडली आहे. चोरट्यांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे मारून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील अंदाजे अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी या दुकानाचे मालक वालचंद आचलदासजी ओसवाल वय ७८ यांनी मुढंवा पोलिसातं तक्रार दिली असून, मुढंवा पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली असून, घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील बोराटे वस्तीमधील अरीहंत ज्वेलर्स या दुकानात घडली. चोरट्यांचा थांगपत्ता अद्यापर्यंत पोलिसांना लागलेला नाही. ओसवाल हे दुकानात दिवसभराचा हिशोब लिहीत असताना दुकानात शिरलेल्या दोघा चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सराफाच्या चेहर्यावर स्प्रे मारला. त्यानंतर त्यांनी दुकानातील अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेले.
पिस्तुलाचा धाक दाखवून चोरीची घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे अरीहंत ज्वेलर्स नावाने बी टी कवडे रोडवर सराफी दुकान आहे. रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दुकानात बसून दिवसभराचा हिशोब लिहीत होते. तेव्हा दोन चोरटे दुकानात शिरले. एकाने दुकानाचे शटर अर्धवट ओढले. तर दुसऱ्याने पिस्तुल बाहेर काढत त्यांच्यावर रोखले आणि त्यांना धाक दाखविला. यामुळे तक्रारदार घाबरले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या चेहर्यावर स्प्रे मारला. डोळ्यात स्प्रे मारल्यानंतर चोरट्यांनी दागिने घेण्यास सुरूवात केली. तेव्हा अशा परिस्थितीत देखील तक्रारदारांनी त्यांना विरोध केला. त्यावर त्याने कंबरेचे लोखंडी हत्यार काढून ‘चुप बैठो’ असे म्हणत त्यांच्या डाव्या खांद्यावर मारले. ते दोघे हाताला लागतील ते दागिने घेऊन पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे तपास करीत आहेत.