शिक्रापूरः शिरुर शहरात बिडी ओढण्याच्या एका जेष्ठ व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. बिडी ओढताना अचानकपणे लुंगीला आग लागल्याने या घटनतेत बिडीचे व्यसन असलेल्या एका जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छोटूभाई फकीर मोहम्मद शेख असे मृत्यू झालेल्या जेष्ठ व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शिरुर पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर येथील डंबेनाला परिसरात मयत छोटूभाई शेख हे राहतात. त्यांना बिडी ओढण्याचे व्यसन होते. ४ डिसेंबरच्या दिवशी शेख हे त्यांच्या राहत्या घराबाहेर खुर्चीवर बसून बिडी ओढत होते. यावेळी अचानक त्यांच्या लुंगीला आग लागली. त्यांच्या आरडोआरडा होताच घरातील व्यक्तींनी त्यांच्या शरीरावर पाणी ओतत आग विझवण्याचे प्रयत्न केला.
मात्र, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ५ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय ८५ वर्षे रा. डंबेनाला शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. याबाबत शेख यांच्या मुलाने हमीद छोटूभाई शेख यांनी शिरुर पोलिसांत खबर दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिपक राऊत हे करीत आहेत.