राजगडः राज्यगड तालुक्याची ओळख ही दुर्गम भाग म्हणून आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेला तालुका म्हणून करण्यात येते. यामुळे येथील भागांत दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसाय वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे या भागात असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनावरांवर उपचार करण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दवाखाने आहेत, तर त्या दवाखान्यात अपुऱी कर्मचारी संख्या आहे. पासली येथील पशुवैद्यकीय दवाखाना तर वर्षांनुवर्ष बंद असल्याने जनावरांना वेळेत उपचार न मिळल्याने जनावरांच्या मृत्यूच्या देखील घटना घडलेल्या आहेत. यामुळे आता तालुक्यातील शेतकऱ्यांनी जनावरे जगावायची तरी कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पासली पशुवैद्यकीय दवाखान्यात डॅाक्टरच फिरकले नाहीत
तालुक्यात ८ पशुवैद्यकीय दवाखाने असून त्यातील २ दवाखाने राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत तर ६ दवाखाने जिल्हा परिषदेद्वारे चालविण्यात येतात. नुकतीच जिल्हा परिषदेने ४ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात केली आहे. यातील काही जण तर दवाखान्यात जातच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच तालुक्यातील पासली या पशुवैद्यकीय दवाखान्यात २ वर्षांपूर्वी नियुक्त करण्यात डॅाक्टरांनी दवाखान्यात पाऊलच ठेवले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
दवाखान्यांची स्थिती चिंताजनक
साखर, पानशेत, कुरण खुर्द येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात राज्य शासनाच्या दवाखान्यात डॅाक्टरच नसल्याचे समोर आले आहे. तसेच दवाखान्यातील कनिष्ठ सहाय्यक व शिपाई ही पदे रिक्त आहेत. शिपाई यांची संख्या १० असताना केवळ २ शिपाई यांची नियुक्ती येथे आहे. या भागातील इतर पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थित दयनीय झाल्याचे पाहिला मिळत आहे.