जेजुरीः मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना पुरंदर विधासभा निवडणुकीत रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. एक जुनी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, कोणत्याही निवडणुकीत नेत्याच्या मागे किती कार्यकर्ते आहेत याला महत्व असते. यामुळे कार्यकर्ते कुठेही नाराज होऊन नयेत म्हणून उमेदवारांना कार्यकर्त्यांना खूष ठेवण्याचे काम केले जात आहे. पुरंदरमधील गावांगावांत कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी जेवणाच्या पंगता ठेवण्यात येत आहे. यामुळे उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे असलेल्या कार्यकर्त्यांची मोठ टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उमेदवारांनी प्रचारात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये म्हणून कार्यकर्त्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. हे कार्यकर्ते जीवाचे रान करून आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी तालुक्यातील गावाच्या गावे पालथी घालून प्रचार करीत आहेत. तसेच प्रचाराच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणावत फिरवल्या जात आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने शेवटच्या सभेची तयारीत करण्यात आ्ली आहे. यासाठी कार्यकर्त्यांची मोठी धावपळ होताना दिसत आहे. काही ठिकाणी आपापसात काही शाब्दिक चकमक झाली तरी त्यांच्या पातळीवर सोडण्याचे प्रयत्न हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. कारण एकच आपल्या वादामुळे आपल्या नेत्याला त्रास होता कामा नये.
कार्यकर्ते आहेत म्हणून उमेदवाराला महत्व
निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्यास त्या उमेदवारास अधिक महत्व प्राप्त होते. यामुळे हरएक निवडणुकीत जितका उमेदवार महत्वाचा तितकाच त्या उमेदवाराचा प्रचार करणार कार्यकर्ता देखील महत्वाचा असतो. तळागळातील मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्ता हा आपल्या उमेदवारासाठी करीत असतो. म्हणून कार्यकर्त्यामुळे उमेदवाराला महत्व आहे.