भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात सध्या भात कापणीला वेग आला असून सकाळी भल्या पहाटे शेतकरी भात कापणीला पसंती देत असल्याचे चित्र आहे. तसेच मोकळी झालेली भात खाचरे रब्बी हंगामातील पीक पेरणी मोकळी करण्यात शेतकरी व्यस्त आहे . सालभराच आपलं महत्वाचे प्रमुख भात पीक घेण्यासाठी शेतातील कामात बळीराजा मग्न झाला आहे.
सध्या ग्रामीण भागातून बैलजोडीची संख्या कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भात मळणीसाठी यांत्रिकीकरणाला पसंती दिली आहे हार्वेस्टर, ट्रॅक्टर भरडणी यंत्र अशा यंत्रांचा भात मळण्यासाठी उपयोग होत आहे . बैलजोडीची मळणी आता हळूहळू काळाच्या पडद्यात जात चालली आहे, क्वचित दुर्गम भागात बैलजोडीची मळणी पाहायला मिळत आहे.
भोर तालुका भाताचे आगार म्हणून ओळखला जातो यावर्षी मात्र भातपिकाला अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने भात पिकाचा उतारा कमी राहिला असल्याचे व काही भात पिके ही भरण्याच्या वेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने भाताचा फूलोरा झडल्याने भात पळंजावर गेले आहे असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी भात पिकाला करपा रोगाच्या प्रादुर्भावाने व उशिरा भात काढल्याने पळंजावर गेल्याने भात पिकाला उतारा कमी मिळाला आहे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. कोळंबा ,रत्नागिरी चोवीस , इंद्रायणी हळवी,गरवी ,सोनम , बासमती ,कोलम , पार्वती , इंडम , रत्ना अशा या जातीची भात पिके काढली जात असून सकाळच्या भल्या पहाटे व सायंकाळी शेतातील काम हे जास्त प्रमाणात होत आहेत असे बसरापुर मधील शेतकरी दत्तात्रय पवार , मोहन पवार, सौरभ तानाजी झांजले, अंकुश कुंभारकर , विजय कुंभारकर, लक्ष्मण कुंभारकर यांनी सांगितले.