साताराः युती आणि आघाडीकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा उमेवारी जाहीर करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून डॅा. नितीन सावंत यांना संधी मिळाली आहे. यातच गेल्या अनेक वर्षांपासून सातारा लोकसभा व विधानसभा मतदार संघ मित्र पक्षाला बहाल केला जात असून, शिवसैनिकांना डावलले जात असल्याचे म्हणत सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख ( शिंदे) पुरुषोत्तम जाधव यांनी जिल्हा प्रमुख व सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे.
वाई विधानसभा मतदार संघातून पुरुषोत्तम जाधव हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्या दृष्टीने गेल्या अनेक दिवसांपासून वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यातील नागरिकांच्या भेटी गाठी ते घेत होते. त्यांच्या वतीने संवाद दौऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा मतदार संघ महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला गेल्याने जाधव हे नाराज होते. अखेर त्यांनी शिवसेना पक्षातील दोन्ही पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे आता जाधव ऐन निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.