मीरा भाईंदर: राज्यात महिल्यांवर तसेच मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यासाठी नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहे. मात्र, या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. अशीच एक संतापजनक घटना या परिसरात घडली आहे. येथील एका घरात घुसून एका विवाहित महिलेचे हात, पाय बांधून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौतम किणी असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून, पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन त्याला अटक केली आहे. घडलेली घटना जर कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या मुलीला संपवून टाकेन, अशी धमकी या विकृताने विवाहितेला दिली होती. असे पोलिसांनी सांगितले आहे.
जीवे मारण्याची धमकी देत केला अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित महिलेचे पती मजुरीचे काम करतात. शनिवारी (14 सप्टेंबर) रोजीच्या रात्री पीडितेचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी या ठिकाणच्या जवळ असणाऱ्या परिसरात राहणारा गौतम किणी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरला. नराधमाने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विवाहितेने त्याला विरोध केला असता, त्याने तिला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर विकृतीचा कळस गाठत या नराधमाने तिचे दोन्ही हात, पाय व तोंड बांधून लैंगिक अत्याचार केला. घाबरलेली महिलेने भाईंदर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवर भाईंदर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.