सातारा: (विजयकुमार हरिश्चंद्रे)
राज्यात दीपावली उत्सव धूमधडाक्यात संपन्न होत असतानाच आपल्या सण उत्सव आणि ऐतिहासिक परंपरा जोपासणारे पुण्यालगतच्या सातारा जिल्ह्याच्या सह्याद्री खोऱ्यातील सज्जनगडच्या पायथ्याशी असलेल्या अंबवडे गाव सध्या राज्यात चांगलेच चर्चेत आले आहे. या गावाला किल्ल्यांचे गाव असे संबोधले जात असून, किल्ल्यांचे गाव पाहायला राज्यातील इतिहासप्रेमी आणि नागरिकांची गर्दी होत आहे.
राज्यभरातील राजगड, प्रतापगड रायगड लिंगणा, राजमाची, विशाळगड, अजिंक्यतारा, तोरणा, वैराटगड हरिहर गड पन्हाळा, पावनखिंड, पुरंदर, विजयदुर्गसह दुर्गम भागातील किल्ल्यांची मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज, राज्यांचे लोकराज्य संस्कृती आणि सामाजिक ऐतिहासिक वास्तव्य असलेल्या प्रतिकृती किल्ले स्पर्धांच्या माध्यमातून साकारलेल्या आहेत. जेमतेम साडेचार हजार लोकसंख्येचे गाव येथील इतिहास प्रेमी शिवप्रेमी ग्रामस्थ दर दिवाळीला विवीध किल्ल्यांच्या प्रतिकृती येथील शेण, माती, दगड आणि टाकाऊ वस्तूपासून आकर्षक किल्ले शेतात घरासमोर गावच्या मध्यभागी बनवलेले आहेत.
येथील मुलांना युवकांना उत्साह प्रेरणा देऊन साहित्याचीही मदत करतात. प्रत्येक घर शिवमय होऊन जाते. किल्ल्यावरची बोलकी चित्रे वास्तू वस्तू अगदी हुबेहूब साधली गेली आहेत. ओढे नाले साफसफाई करुन उभारलेले किल्ले लक्षवेधी ठरताना दिसत आहेत. किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांची माहितीची चिमुरडी मावळे देत असतात. केवळ किल्लेच नव्हे, तर येथील मुलींना दानपट्टा, तलवारबाजीचे आत्मसंरक्षण करणारे धडे शिकवले जातात.
आजच्या पिढीला इतिहास आणि किल्ल्यांचे महत्व समजणे, किल्ल्यांचे शास्त्रीय महत्व त्याचे स्थापत्त्य शास्त्र समजवणे आणि इतिहासाला उजाळा मिळावा म्हणून अंबवडे ग्रामस्थ गेली तेरा वर्ष किल्ल्यांचे गावं हा उपक्रम राबवित असल्याची माहिती येथील ग्रामस्थ राजेन्द्र जाधव सचिन जाधव यांनी दिली. सण उत्सव पुस्तकांचे, गावं फुलांचे गावं, फुलपाखरांचे गावं, कवितांचे गावं म्हणून ओळखला जाणारा सातारा आता किल्ल्यांचे गावं म्हणून ओळखला जाईल यात शंका नाही.