पुंरदरः विद्यमान आमदार संजय जगताप यांना पुरंदर-हवेली विधानसभा लढविण्याची दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत करण्यात आली आहे. लोकसभेनंतर या विधानसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार म्हणून संजय जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा होती आणि त्यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे इथला आघाडीचा उमेदवार म्हणून संजय जगताप हेच निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. असे असताना अद्यापर्यंत महायुतीच्या उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मा. मंत्री विजय शिवतारे यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र युतीकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे युतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
युतीचा उमेदावार कोण?
पुरंदरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला मिळत आहे. युतीकडून इच्छुक उमेदवार आशा लावून रांगेत उभे आहेत, यामुळे इथून युतीचा उमेदवाराबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. युती आणि आघाडीकडून जागावाटपाचा तिढा अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काही जागांवर तोडगा निघणे बाकी आहे. एका अर्थान युती आणि आघाडीतील घटक पक्षांकडून जागांसंदर्भात घमासान सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे. यामुळे पुरंदरमध्ये देखील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. जगताप यांच्याकडून गावोगावी जात नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय रणनिती आखली जात आहे.
जगताप यांचे कार्यकर्ते अॅक्टीव्ह मोडवर
दुसरीकडे विजय शिवतारे हे देखील गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत असल्याचे पाहिला मिळत आहे. एकप्रकारे युतीकडून निवडणूक लढविणार असे संकेत त्यांच्याकडून मिळताना दिसत आहेत. पुरंदरची जागेवर दोन टर्म भगवा फडकवण्यात आला होता. २००९ आणि २०१४ मध्ये येथून विजय शिवतारे हे विजयी झाले होते. २०२९ च्या निवडणुकीत मात्र संजय जगताप यांनी आपल्या माथी विजयाचा गुलाल लावत विजय झाले होते. सध्याच्या घडीला जगताप यांचे कार्यकर्ते चांगलेच अॅक्टीव्ह झाल्याचे पाहिला मिळत आहे. विविध गोष्टींवर चर्चा होताना दिसत आहे.
झेंडेंची भूमिका पाहणे औचिक्याचे ठरणार
मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी तुतारी हाती घेतली आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केल्याने गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करणारे झेंडे यांची तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणे अशक्य झाले आहे. यामुळे आता ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झेंडे हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. असे सांगण्यात आले आहे. आता युतीकडून कोण निवडणुकीच्या रिंगणात असणार आणि संभाजीराव झेंडे काय भूमिका घेणार यावर इथली राजकीय गणितं अवलंबून आहेत. पुरंदर विधानसभा निवडणुकीत काही अचंबित करणाऱ्या गोष्टी घडतील, असे देखील काही जाणाकार मंडळी सांगत आहेत.