लोणी काळभोर: ज्ञानेश्वर शिंदे
राष्ट्रवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही आज जाहीर केली आहे. यामध्ये शिरुर येथून माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार यांनी तगडा नेता मैदानात उतरवला आहे. त्यामुळे शिरूर विधानसभेचा अजित पवार गटाचा जागेचा तिढा सुटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या जागेवर सस्पेन्स कायम होता. पण, आता या जागेवरुन अजित पवार गटाने माऊली कटके यांना उमेदवारी दिली आहे.
यामुळे भाजपचे नेते प्रदीप कंद यांचा पत्ता मात्र कट झाला आहे. माऊली कटके यांच्या उमेदवारीने शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुती दोघांमध्येही जागावाटपावरुन संघर्ष पाहायला मिळाला. अनेक मतदारसंघांबाबत रस्सीखेच सुरु होती. अद्यापही काही जागांचा तिढा सुटलेला नाही. मात्र, आता महायुतीतील जागावाटपाचा गुंता बऱ्यापैकी सुटलेला दिसत आहे. त्यापैकीच एक असलेल्या शिरूर विधानसभा मतदारसंघाचा तिढाही सुटला आहे. अशोक पवार यांच्याविरोधात माऊली कटके हे निवडणुकीच्या मैदानात असतील. याशिवाय, अजित पवार गटाच्या पुणे जिल्ह्यातील सर्वच जागाचा तिढा सुटला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये त्यांनी सात उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत पुणे विभागातून वडगाव शेरी आणि शिरुर मतदारसंघात उमेदवार देण्यात आला आहे. वडगाव शेरी येथून विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले माऊली कटके यांनी हाती घड्याळ बांधल्यानंतर शिरुर येथून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. ते अशोक पवार यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.