नगरः येथील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावामध्ये भाजपचे सुजेय विखे पाटील यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते. यावेळी सुजेय विखे यांचे कट्टर सर्मथक म्हणून ओळख असलेले वसंतराव देशमुख यांनी भाषणात काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची स्नुषा डॅा. जयश्री थोरात यांच्या विषयी खालच्या शब्दांत टीका करीत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या विधानानंतर संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उसळून आला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार थोरात समर्थकांनी सुजेय विखे यांचे बॅनर्स फाडले. काही गाड्यांची तोडफोड तर काही गाड्या जाळण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. काल रात्री देशमुखांच्या वक्तव्याचे पडसाद तालुक्यात उमटल्याचे पाहिला मिळत आहेत.
नेमकं काय घडलं?
सुजेय विखे यांच्या वतीने धांदरफळ बुद्रुक या संगमनेर तालुक्यातील गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत वसंतराव देशमुख जे की बाळासाहेब थोरात यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांनी भाषणाला सुरूवात केली. भाषणामध्ये थोरात यांच्या स्नुषा डॅा. जयश्री थोरात यांच्याबद्दल राजकीय टीका करताना त्यांची जीभ घसरली. बोलण्याच्या ओघात त्यांनी डॅा. जयश्री यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा समाचार घेताना अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली. डॅा. जयश्री यांनी त्यांच्या भाषणात खबरदार माझ्या बापाविषयी बोलालं तर असे म्हणत ज्यांना स्वःताचं घर सांभाळता आलं नाही ते काय तालुक्याचं भलं करणार असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना वसंतराव देशमुख यांची जीभ घसरली आणि त्याचे पडसाद संबंध तालुक्यात उमटलेले आहेत.
वसंत देखमुखांचे आक्षेपार्ह वक्तव्य
सगळ्या जनतेला जन्म तुम्हा दिलाय असं म्हणायचं बहुतेक. त्यांची नात म्हणते माझा बाप सगळ्यांचा बापच आहे म्हणे. तिला काय कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कशी झालं हा प्रश्न आहे, आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. तिला सुजेय दादा प्रेमाने ताई म्हणतात. पण दादा या ताईचे पराक्रम पाहिले ना, ते सगळ्या तालुक्याला माहित आहे. असे देशमुख म्हणाले होते.
कार्यकर्त्यांनी ढकलून दिलंः महिलेचा आरोप
त्यांच्या या विधाननंतर गावात मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर याचा जाब विचरायला गेलेल्या एका महिलेने सांगितलं की, सभा संपल्यानंतर आम्ही स्टेजवर गेलो. त्यावेळी मी विचारलं की वसंत देशमुख कुठे आहेत, त्याला बोलून आणा. यावेळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला ढकलून दिलं, असा आरोप या महिलेने केला आहे.
तोडफोड आणि शाईफेक
त्या ठिकाणी आलेल्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. काही गाड्या जाळ्याण्यात आल्या आहेत. सुजेय विखे यांचे बॅनर्स फाडण्यात आले. त्यांच्या पोस्टरवर शाईफेक करण्यात आली. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पोलीस स्टेशनबाहेर महिलांचा ठिय्या
हळूहळू घटनेचे पडसाद तीव्र होत गेले आणि महिलांनी पोलीस स्टेशन गाठत. पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला. अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. यावेळी महिलांवर अशा प्रकारे आक्षेपार्ह विधान करणे चुकीचे असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी या महिलांनी केली. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हटणार नाही. अशी भूमिका या महिलांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी महिलांना सजवून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला शांत झाल्या होत्या. मात्र, या घटनेचे पडसाद तोपर्यंत तालुक्यासह जिल्ह्यात उमटल्याचे दिसून आले.
एकूण चार गुन्हे दाखल
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एकूण चार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी काल झालेल्या सभेनंतर त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले होते. या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले असून, चौथा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे कुणाल सोनवणे उपविभागिय अधिकारी यांनी सांगितले.
अतिशय घाणेरडे आणि निंदनीयः डॅा. जयश्री थोरात
एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं योग्य नाही. राजकीय वैर आणि राजकीय मतभेत असतात. पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलता ना तेव्हा तुमचे तुम्ही विचार दाखवता. हे सर्व अतिशय घाणरडे आणि निंदनीय असल्याचे डॅा. जयश्री थोरात यांनी सांगितलं आहे.
त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावीः सुजेय विखे पाटील
या प्रकरणी पोलीस प्रशासन जी काही कारवाई करण योग्य आहे, त्यांनी तो कलम लावून वसंतराव देशमुख यांच्यावर व त्या वक्यव्यावर कारवाई करावी. त्या मध्ये आम्ही मध्ये येणार नाही. मात्र, ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या सभेला आलेल्या महिलांचा देखील अशा प्रकारे गाडीमध्ये उतरुन काही लोकं शेतामध्ये गेली. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुजेय विखे पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील विरुद्ध थोरात संघर्षाचा नवा अध्याय
वसंत देशमुख यांच्या विधानामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेचं तापले असून, पुन्हा एकदा विखे पाटील विरुद्ध थोरात संघर्षाच्या नवा अध्याय सुरु झाला आहे. येत्या काही दिवासांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे. अशा वातावरणात आरोप प्रत्यारोप हे होतच असतात परंतु त्याला आता कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. याचे उदाहरण म्हणुन देशमुख यांचे विधान आहे.