पुणे,: पुणे- सोलापूर महामार्गावर कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीत दोन कोयते मिळून आले त्यानुसार चंद्रशेखर दाजी चोरमुले (वय -२९, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) व आकाश मधुकर लांडगे (वय -१९, रा. बस स्टॉपच्या पाठीमागे, उरुळी कांचन, ता. हवेली) यांना अटक केली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास एका खबऱ्या कडून माहिती मिळाली की, पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील पुणे सोलापूर हायवे रोड लगत हॉटेल चायनीज कट्टा समोर उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या गाडीत दोघेजण कोयते बाळगून बसले आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक लाल रंगाची चारचाकी गाडी दिसून आली.दरम्यान, गाडीची पाहणी केली असता गाडीत एक हजार रुपये किमतीचे दोन कोयते मिळून आले. या प्रकरणी चंद्रशेखर दाजी चोरमुले (वय -२९, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) व आकाश मधुकर लांडगे (वय -१९, रा. बस स्टॉपच्या पाठीमागे, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोयते व एक चारचाकी गाडी असा 5 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहाय्यक फौजदार नवले, पोलीस हवालदार रणजीत निकम, रमेश भोसले, सचिन जगताप, पोलीस शिपाई दीपक यादव, सुदर्शन माने यांनी केली आहे.