पुणेः राज्यात सध्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार (bopdev ghat gang rape) प्रकरणावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. यातच पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असला, तरी संशियत आरोपींचे पीडितेने वर्णन केलेले स्केच आणि सीसीटीव्ही फुटेज या शिवाय पोलिसांकडे ठोस पुरावा नाही. संशियत आरोपींचा शोध घेण्यासाठी २५ पथके रवाना करण्यात आली आहे. तसेच गुप्त बातमीदारकडे विचारपूस करण्यात येत आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध लागावा याकरिता पोलिसांनी यापूर्वी या घाटामध्ये लूटमार करण्याचे तसेच विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींकडे कसून चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणातील तपासात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल तीन हजार मोबाईल क्रमांकांचा डंप डाटा काढला आहे. आरोपींना पकडून देणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा पोलिसांनी केली आहे. तसेच आरोपींना शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यासह सोलापूर, सातारा जिल्ह्यातील २०० संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, बांबू, तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यामुळे आता या प्रकरणात आणखी काय समोर येते आणि पोलीसांसमोर या घटनेतील आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान असणार आहे.